सीईओ मीनल करनवाल यांचे आदेश
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेत हलगर्जीपणा आणि कार्यात अनास्था दाखवल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात निलंबनाचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमजद खान हे वैद्यकीय देयकाचे कार्यासन सांभाळत असताना विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर शासनाकडे पाठवण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा आवश्यक अभिप्राय न घेता, थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर केले. तसेच संबंधित कार्यासनाशी निगडित असलेले काम वेळेत पूर्ण न करणे, अपूर्ण ठेवणे आणि प्रशासकीय नियमांची पायमल्ली केल्याचे सात मुद्दे तपासात निदर्शनास आले.
या निष्काळजीपणाला शिस्तभंग कारवाईचा भाग मानत, जिल्हा परिषदेने अमजद खान यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.









