पारोळा तालुक्यातील पळासखेडे येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळासखेडे येथील जि. प.च्या शाळेत ५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. पारोळा कुटीर रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत रनाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जिनेंद्र पाटील, कर्मचारी समाधान पाटील, राजू वानखेडे, परिचारिका बोरसे यांनी उपचार केले. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील. प्रभारी केंद्रप्रमुख संजय राजपूत आदींनी भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुटीर रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती.
शाळेतील ओम प्रदीप पवार (१२), दिव्या चेतन पाटील (१२), लावण्या गणेश पाटील (१२), लक्ष्मी अतुल मराठे (१२) व ज्योती संजय ठाकरे (१४) या विद्यार्थ्यांनी दुपारी खिचडीचे जेवण केल्यानंतर काही तासाने अचानक चक्कर, मळमळ, उलट्या असा प्रकार जाणवू लागला. त्यांना तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली, त्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या टीमने केली. शेळावे आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह इतर डॉक्टरही उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांची तपासणी केली असून इतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. पाच विद्यार्थ्यांना पारोळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. याबाबत घटनेची उद्या सकाळी चौकशी करण्यात येईल असे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी सांगितले आहे.