जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक (लेखा) प्रवीण पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांच्याशी हुज्जत घातल्याचा प्रकार सप्टेंबर महिन्यात घडला होता. याबाबत सदस्य नाना महाजन यांनी जि.प.सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडे प्रवीण पाटील यांच्या चौकशीची मागणी केली होती. सीईओंनी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांना चौकशीसाठी पत्र दिले होते. मात्र, संबंधित कर्मचार्याची चौकशी न करता त्याला पदोन्नती देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रारीची चौकशी न करता पदोन्नती देण्याचा प्रकार म्हणजे पदाधिकार्यांचा अपमान असून तातडीने पदोन्नती थांबवावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
दि.7 सप्टेंबरला जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांनी बांधकाम विभागात गेले असता बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक असलेले प्रवीण पाटील यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर सदस्य महाजन यांनी कामकाजाबाबतचे लेखे व्यवस्थित न ठेवणे, प्राधान्य क्रमाने आलेल्या बिलांची माहिती शासनास न पाठविणे, लोकप्रतिनिधींशी हुज्जत घालणे आदी प्रकारची तक्रार सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांच्याकडे करत चौकशीची मागणी केली होती. या मागणीनंतर सीईओंनी चौकशीचे आदेश दिले होते. परंतु संबंधित कर्मचार्याची चौकशी दीड महिने थांबविण्यात येऊन त्याला बढती देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या कर्मचार्याची पदोन्नती न थांबविल्यास उपोषण करण्याचा इशारा जि.प.सदस्य नाना महाजन यांनी दिला आहे.







