जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) :- ग्रामीण भागात एका तरुणाला राहत्या घरी रात्री झोपला असताना विषारी सापाने जीवघेणा दंश केला. गंभीर झालेल्या तरुणाला योग्य ते औषधोपचार करून वैद्यकीय पथकाने मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याची घटना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली आहे. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
भडगाव तालुक्यातील शिवनी येथील २५ वर्षीय तरुण कर्णसिंग धैर्यसिंग पवार याला गुरुवार दि. १४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता घरात झोपला असताना उजव्या कानाला मण्यार या अतिविषारी सापाने दंश केला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे प्रथमोपचार करून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी औषधवैद्यक शास्त्र विभागात अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांनी तातडीने दाखल करून घेत उपचार सुरू केले. विविध तपासणीअंती त्याच्यावर व्हेंटिलेटर लावून उपचार करण्यात आले. मण्यार हा साप नागापेक्षा अधिक विषारी असून मेंदू आणि श्वसनसंस्थेवर त्याचे विष परिणाम करते. त्यामुळे रुग्ण बेशुद्ध होऊन त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.
औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचवले. यात औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार, श्वसन विकार विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ पुजारी, डॉ. सायली पाटील, डॉ. ऋचा चौधरी, डॉ. गोपाल घोलप, डॉ. पराग चोले, डॉ. प्रणव पाठक, कक्ष क्र. १४ येथील इन्चार्ज परिचारिका रूपाली पाटील यांनी रुग्णावर उपचार करून देखरेख ठेवली. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला यशस्वीरित्या बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी कान नाक घसा शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. अक्षय सरोदे उपस्थित होते.