जळगाव शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जोशीपेठ झोपडपट्टीमध्ये अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारींनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी ८ मार्च रोजी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन ठिकाणी एकूण २५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच, या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावमधील नेरी नाका परिसरातील एका मार्केटच्या मागे असलेल्या झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे वारंवार याबाबत लक्ष वेधले होते. यामध्ये हातभट्टी दारू, गांजा, चरससारखे अंमली पदार्थ, तसेच गावठी कट्ट्यांची विक्री केल्या जात असल्याची माहिती होती. या तक्रारींची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्याचा निर्णय घेतला. विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन यांनी भरारी पथकाचे निरीक्षक अशोक तारू आणि दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार, शनिवारी सकाळी पथकाने जोशीपेठ परिसरात धाड टाकली. कारवाईदरम्यान, जमुनाबाई राजेश लोट (वय ५५) आणि कलाबाई बाजीलाल गुंजे (वय ६७) या दोघींच्या झोपडीमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू साठवून ठेवली जात असल्याचे आढळून आले. पथकाने एकूण २५ लिटर गावठी दारू जप्त केली. यानंतर दोन्ही महिलांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.