अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील घटना
अमळनेर प्रतिनिधी : – झोपडीला अचानक आग लागल्याने बोदर्डे येथील काशिनाथ दिलबर भिल या वृद्धाचे कुटुंब उघड्यावर आले असून संसार उध्वस्त झाल्याची घटना सोमवार २६ रोजी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोदर्डे गावात घडली.
काशीनाथ भिल पत्नीसह मुलगा, सून, नातवंडे यांच्यासह झोपडीत राहतो. परिस्थिती हलाखीची असल्याने दुसर्याकडून वीज कनेक्शन घेऊन कामापुरता वीज वापरत होता. दिनांक २५ रोजी रात्री काशिनाथ घरात चिमणी लावून झोपला होता. कुटुंबांतील इतर सर्व सदस्य समोर एका ओट्यावर झोपले होते. २६ रोजी पहाटे अचानक घराला आग लागली. काशिनाथ जेमतेम घराबाहेर पडला आरडाओरडा सुरू झाला. लोक गोळा झालें. तोपर्यंत झोपडी जाळून खाक झाली होती. काशीनाथने ऊस तोडणीचे मिळालेले रोख रक्कम देखील घरात ठेवली होती. पैश्यांसह घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे, पैसे, दूरदर्शन संच, तसेच महत्त्वाची कागदपत्रेही जळून गेले. संपूर्ण संसार उध्वस्त झाल्याने कुटुंब उपासमारीच्या संकटात सापडले आहे.
त्यांच्या अंगावर देखील कापड राहिलेले नाही. काही अल्युमिनियम चे भांडे वितळले आहेत. शासनाने या दुर्घटनेची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत व आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.