जळगाव (प्रतिनिधी) – शेतात काम करीत असताना झाडावर चढलेल्या शेतकऱ्याचा झाडावरून पडून डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २४ जुलै दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

दत्तू चिंधा पाटील (वय ६० वर्ष) राहणार पिंपळे बुद्रुक ता. धरणगाव हे शेतामध्ये काम करीत होते. दुपारी झाडावर चढून ते काम करीत असताना अचानक त्यांचा तोल गेला. आणि ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. आजूबाजूच्या शेतकर्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी अजय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यांचे शवागारात शवविच्छेदन करण्यात आले.







