५६ हजारांचा मुद्देमाल चोरीस
यावल (प्रतिनिधी) – यावल येथील प्रसिद्ध मुंजोबा यात्रेच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान मुंजोबा यात्रा परिसरात ही घटना घडली. यात्रेत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी एकूण ५६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला असून त्यात ५ महिलांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
यांचे मंगळसूत्र झाले चोरी
१) मंदाकिनी मुकेश गजरे (फिर्यादी): १०,५०० रुपयांचे मंगळसूत्र (२.५ ग्रॅम).
२) राखी प्रमोद सुरवाडे: ९,००० रुपयांचे मंगळसूत्र (३ ग्रॅम).
३) रूपाली शरद कोळी: १०,५०० रुपयांचे मंगळसूत्र (२.५ ग्रॅम).
४) रोहिणी निलेश जाधव: १२,००० रुपयांचे मंगळसूत्र (३ ग्रॅम).
५) स्वाती चंद्रशेखर वराडे: १४,००० रुपयांचे मंगळसूत्र (४ ग्रॅम).
याप्रकरणी मंदाकिनी गजरे (वय ३८, रा. सिद्धार्थ नगर, यावल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुल पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









