शेती क्षेत्राचे अंतिम पंचनामे करण्याच्या तहसीलदारांच्या सूचना
यावल (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर वादळी वार्यासह पावसाचा तडाखा बसला. पावसामुळे नऊ गावातील शेतातील केळी, दादर, टमाटे, पपई, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल २१६ शेतकर्यांच्या एकूण १९८.५० हेक्टरवरील पिकाला या वादळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आता या संपूर्ण शेती क्षेत्राचे अंतिम पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत. काही भागात तहसीलदारांनी स्वतःच भेट देऊन पाहणी देखील केली.
यावल तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे यावल तालुक्यातील थोरगव्हाण, पिळोदे खुर्द, मनवेल, दगडी, यावल शेत शिवार, डोणगाव, हिंगोणा व शिरागड या भागाला वादळी पावसाचा प्रचंड मोठा फटका बसला. शुक्रवारी शेती पिकांच्या नुकसानाची पाहणी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, कृषी अधिकारी अजय खैरणार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, साकळी मंडळधिकारी सचिन जगताप, तलाठी विजय वानखेडे, कृषि साहायक मार्कडेय मिटके, विजय भालेराव या पथकाने केली.
त्यांनी थोरगव्हाण शेत शिवार गाठले व या शेत-शिवारात जावून पाहणी केली. यात पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण पाटील, गोविंद पाटील, लहु बंडु सोनवणे यांच्या शेतातील केळी पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या. प्रारंभीक नुकसानीचा अंदाज प्राप्त झाला असून आता अंतिम पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली.