मध्यप्रदेश, कर्नाटक येथील दोघांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) : विशेष मोहिमेदरम्यान फैजपूर उपविभागात फैजपूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने एका कारवाईत ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची बाजारमूल्य रु. १ लाख ९४ हजार ३४० रुपये इतकी आहे. अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल, पोहेकॉ. प्रविण भालेराव, पोहेकॉ. मुरलीधर धनगर, पोकॉ. सिद्धेश्वर डापकर, पोकॉ. गोपाल पाटील, चा. पोकॉ. महेश सोमवंशी हे गुरुवारी दि. २८ ऑगस्ट रोजी शासकीय वाहनाद्वारे फैजपूर उपविभागात गस्त घालीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्हावी गावाजवळील शेतातील एका पत्र्याच्या घरात काही व्यक्ती गांजा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानीक गुन्हे शाखा, जळगाव) यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार, संपूर्ण पथकासह फैजपूर पोलीस ठाणे गाठण्यात आले. प्रभारी अधिकारी सपोनि. रामेश्वर मोताळे, तसेच यावल पो.स्टे.चे पोनि. रंगनाथ धारबळे यांच्या उपस्थितीत आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून छापेमारी करण्यात आली.
न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत किशोर भागवत पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या घरात संशयित हालचाली पाहून छापा टाकण्यात आला. त्यावेळी दोन व्यक्ती घरात आढळून आले. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ९ किलो ७१७ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.संशयित आरोपी रगन सुकराम बारेला (वय ३२ वर्षे, रा. महादेव शिरवेल, ता. भगवानपूरा, जि. खरगोन,मध्यप्रदेश) व अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी (वय २७ वर्षे, रा. सिध्दबलपूर, एलहंका, बेगळुरु अर्बन, कर्नाटक) यांना अटक झाली. हे दोन्ही आरोपी बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून विक्रीच्या उद्देशाने थांबले होते. त्यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत फैजपूर पोलीस ठाण्यात एलसीबी चे अंमलदार सिद्धेश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरून एन डी पी एस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे
कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कारवाईत स्थानीक गुन्हे शाखा, जळगाव आणि फैजपूर पोलीस स्टेशन यांचे एकूण २० हून अधिक अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते. पोनि. रंगनाथ धारबळे (यावल पो.स्टे.) सपोनि. रामेश्वर मोताळे (फैजपूर पो.स्टे.) पोउपनि. शरद बागुल, निरज बोकील, विनोद गाभणे पोहेकॉ: प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, देवेंद्र पाटील, विकास सोनवणे पोकॉ: सिद्धेश्वर डापकर, गोपाल पाटील, भुषण ठाकरे, महेश सोमवंशी, सफौ: देविदास सुरदास आदी सहभागी होते.