जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : घरफोडीतील फरार संशयित आरोपीस शनीपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरातील नेरी नाका परिसरातून ताब्यात घेत जेरबंद केले आहे. त्याच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
सदबीरसिंग बलमतसिंग टाक असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव असून तो यावल पोलिसांना हवा होता. जळगाव जिल्ह्यासह राज्याबाहेर विविध पोलिस स्टेशनला सदबिरसिंग याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक कावेरी कमलाकर यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यावल पोलिसांना हुलकावणी देत फरार होण्यात सदबिरसिंग टाक हा सातत्याने यशस्वी होत होता. अटकेतील सदबिरसिंग याचे साथीदार यापुर्वी अटक करण्यात आले आहेत. मात्र मुख्य सुत्रधार सदबिरसिंग हा पळून गेला होता.
अटकेतील सदबिरसिंग हा राज्याबाहेर देखील विविध पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सुरत येथे देखील गुन्हे दाखल आहेत. जळगाव जिल्ह्यात एमआयडीसी, शनीपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगर, जळगाव तालुका, जामनेर आदी पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचे घरफोडीच्या गुन्ह्यात चांगले नेटवर्क आहे. घरफोडीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ती मोहीम सुरु असतांना पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सदबिरसिंग टाक हा त्यांच्या पथकाच्या हाती लागला. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील हे.कॉ. अल्ताफ पठाण, योगेश जाधव, अमोल वंजारी, निलेश घुगे, काजल सोनवणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.