डांभुर्णी (ता.यावल) येथील बालकाच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित यश पाटीलला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने तीन खुनांची कबुली दिली. यावल पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर जमावाने संशयिताला आमच्याकडे सोपवा असा आग्रह धरला होता. पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेकीसह, ग्रामपंचायतीवर हल्ला झाला होता. यश पाटीलला वाचवल्याच्या संशयातून सरपंचाच्या घरावरही हल्ला झाला होता. स्थानिक राजकारणाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दाखल गुन्ह्यात पत्रकाराला अटक करण्यात आली. या घटनाक्रमापर्यंत आपण कणखर स्वभावाचे असल्याचा डांगोरा पिटणार्या पो. नि. अरुण धनवडेंचे आता एकामागून एक पराक्रम बाहेर येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात यावल तालुक्यातील गावठी दारू पाडणार्या दहा-पंधरा आरोपींना पोलिस ठाण्यात उठाबशा काढायला लावून त्यांना विषारी दारूने लोक कसे मरतात याचे भाषण धनवडेंनी दिले होते. अशातच जळगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांची मद्यतस्करी गुन्ह्यात नियंत्रणकक्षात रवानगी झाल्याने रिक्त जागेसाठी अरुण धनवडे यांच्यासह तीन पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठवले गेले होते , त्यात अरुण धनवडे यांची सरशी ठरणार असल्याचे संकेत असतानाच या साहेबांचे वादग्रस्त विषय रोजच समोर येऊ लागले आहे. त्यामुळे धनवडेंचा मुद्दा आता जिल्हा पोलिस अधीक्षक कसा हाताळतात , याची उत्सुकता यावल परिसरासह पोलिस दलातही दिसते आहे.
लॉकडाऊनमधील मेळाव्यातून चेल्यांची मखलाशी
राज्यात लॉकडाऊनचे पालन होत असताना 25 एप्रिलरोजी शंभर- सव्वाशे ग्रामस्थांचा जमाव पोलिस ठाण्याच्या आवारात एकवटला होता. या जमावातील त्यांच्या चेलेचपाट्यांनी धनवडे साहेबांची बदलीच होऊ नये यासाठी घोषणाबाजी केली होती. पो.नि. अरुण धनवडे हे देखील या जनसमुदायाला संबोधित करत होते. तेथे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे निर्बंध आणि संचारबंदी-जमावबंदीचे नियम पायदळी तुडवले गेले. दुसर्या दिवशी सकाळी साहेबांचे गल्लो-गल्ली स्वागत सत्काराचे आयोजन झाले होते, येथेही सोशल डिस्टन्सींग आणि जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले होते. तो मेळावा व चेलेचपाट्यांचे सत्कार स्वीकारताना माझ्या यावल येथील कामगिरीचा विचार करूनच वरिेष्ठांनी मला जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारीपद देऊ केलेले असल्याचीही आवई पो. नि. धनवडेंनी उठवली होती. लॉकडाऊन फाट्यावर मारणारा तो मेळावा व सत्काराचे व्हीडीओ धनवडेंच्या हितचिंतकांनीच व्यवस्थितपणे वरिष्ठांकडे पेहचवले आहेत. यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली एमआयडीसी पोलीस स्टेशनाला होत असल्याच्या चर्चेने शंभरावर लोकांचा जमाव जमला होता . यावेळी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून एवढी गर्दी जमा होण्याचे कारण काय असा प्रश्न तालुकावासीयांना पडला निरीक्षकांच्या समर्थनार्थ हा जमाव जमल्याचे उघड झाल्याने आणि स्वतःच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कामगिरी पाहून प्रमोशन केल्याचे उपस्थितांना सांगितले . तीन महिन्याच्या कारकिर्दीत तालुक्यात आदरयुक्त भीती निर्माण केली तशीच आपण ठेवावी असे उपस्थितांना आवाहन त्यांनी केले .
त्यामुळे उत्साहत वातावरणनिर्मिती करण्याच्या धडपडीत धनवडेच आता गोत्यात आलेले आहेत. वास्तव असे आहे की, यावल येथील मनमानीमुळे पो. नि. धनवडेंच्या बदलीचा दबाव वाढलेला असताना जणू वरिष्ठ कौतुकाने आपली बदली जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारीपदी करीत असल्याची वातावरणनिर्मिती धनवडे करीत आहेत.
अंधश्रद्धेतून एखाद्याच्या अंगात देवाचा संचार होतो तसाच काहीसा प्रकार धनवडेंच्या बाबतीत घडल्याची चर्चा आहे. शोले सिनेमातील वीरु पाण्याच्या टाकीवर चढून गाव गोळा करतो, अगदी तसेच एका उंच चौथर्यावर निरीक्षक अरुण धनवडे चढलेले आहेत. त्यांच्या सत्काराच्या व चेलेचपाट्यांच्या मेळाव्यांच्या व्हिडीओवर पार्श्वगीत सिंघमचे आहे आणि खाली उभ्या लोकांसमोर हे साहेब स्टाईल दाखवत असल्याचा टिकटॉक सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. जमावबंदी असताना या जमावावर गुन्हे का दाखल झाले नाहीत असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
कोरोना संशयिताचा मृतदेह तालुक्यात आणू नये यासाठी शिवीगाळ दमदाटी, लॉकडाऊनचे उल्लंघन करून पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमवणे, बढतीचे सत्कार समारंभ आणि आता टिकटॉकवर सिंघम स्टाईल व्हिडिओ व्हायरल करणार्या यावल पोलिस निरीक्षकाच्या या कृत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच या गावठी सिंघमची एमआयडीसी पोलिस ठाण्यासाठी निवड होणार असल्याने या ठाण्याचे कार्यक्षेत्रही चिंतेत आहे. बदलीबाबत आदेश नसतांना पोलीस निरीक्षकांनी भाषणात एमआयडीसी पोलीस स्टेशनला बदली करण्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांची बदली खरेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे का याचा खुलासा पोलिसांकडून होणे गरजेचे आहे .