सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण तपासणी मोहीम ; पहिल्याच दिवशी 75 रुग्णांची तपासणी
अमळनेर : कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून त्यावर निर्बंध घालता यावा यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आगळा वेगळा प्रयोग राबवून सर्व सर्दी ,ताप रुग्णांना एकाच ठिकाणी वळवण्याचा निर्णय घेतला असल्याने विषाणूंचा इतरत्र संसर्ग न होता लवकर नियंत्रण मिळवता येणार आहे.
बाहेर गावाहून आलेले तसेच,सर्दी तापाच्या रुग्णांना तपासण्याची यंत्रणा अपूर्ण पडत असल्याने संशयित रुग्ण देखील आढळून येत नव्हते म्हणून आमदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची व तज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन नवीन संकल्पना मांडली त्यानुसार अंमलबाजवणी सुरू केली शुक्रवारपासून सानेगुरुजी शाळेत तज्ञ डॉक्टरांकडून दररोज 10 ते 1 या काळात तपासणी सुरू केल्याने रुग्णांचे विलगीकरण होत आहे .
सकाळी सानेगुरुजी शाळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी करून पूर्ण निर्जंतुक केली. स्वतः आमदार अनिल पाटील देखील फवारणी करत होते त्यांनतर एक बालकांचा व एक प्रौढांचा कक्ष तयार करण्यात आला . बालरोग तज्ञ डॉ नितीन पाटील , डॉ जी एम पाटील , एम डी डॉ अविनाश जोशी , डॉ किरण बडगुजर , डॉ संदीप जोशी , डॉ राजेंद्र शेलकर ,डॉ प्रशांत शिंदे आदींनी रुग्णांची तपासणी सुरू केली यामुळे तालुक्यातील खाजगी व सरकारी रुग्णालयातील कोरोना लक्षणे असलेले तसेच सर्दी खोकला , तापाचे रुग्ण एकाच ठिकाणी वळवण्यात आले आहेत. त्यामुळे इतरत्र संसर्ग न वाढता लवकर नियंत्रण मिळवता येणार आहे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, विक्रांत पाटील, एल टी पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी , डॉ विलास महाजन , पालिका कर्मचारी महेश जोशी, भालचंद जगताप, कीर्ती गाजरे ,मीरा देवरे हजर होते.
बाहेरून आलेल्या व स्थानिक रुग्णांची येथे तपासणी मोफत करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व खाजगी व खाजगी दवाखान्यातील सर्व डॉक्टरांनी सर्दी ताप खोकल्याचे सर्व रुग्ण याठिकाणी पाठवावेत जेणेकरून कोरोना आहे किंवा नाही याची खात्री होईल व सर्व तालुक्यातील रुग्णांची एका ठिकाणी माहिती जमा होईल. संशयित रुग्ण सापडल्यास भविष्यातील कोरोनाला अटकाव करता येईल. शुक्रवारी आमदार चक्क दुपारी 1 वाजेपर्यंत हजर होते यावेळी तपासलेल्या रुग्णात 49 मोठे नागरिक व 26 बालकांची अशा 75 जणांची तपासणी करण्यात आली.