नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – व्हाटसअँप अकाऊंट हॅक केल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाइलमधले मेसेज आणि संपर्क आरोपीच्या लॅपटॉपमध्ये आल्यानंतर संपर्कातील लोकांकडे पैसे मागत लुबाडणारी टोळी दिल्ली पोलिसांनी पकडली आहे .
दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने व्हाटसअँप हॅक करणाऱ्या विदेशी नागरिकाला अटक केली आहे. ही टोळी लॅपटॉपमधल्या ऍप्लिकेशनच्या मदतीने लोकांचे व्हाटसअँप अकाऊंट हॅक करायची. नंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलमधले मेसेज आणि संपर्क आरोपीच्या लॅपटॉपमध्ये यायचे.
हॅक केल्यानंतर ही गँग त्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांशी संपर्क साधायची आणि त्यांच्याकडे पैसे मागायची. त्यामुळे त्या लोकांना वाटायचं की आपला मित्र किंवा नातेवाईकच आपल्याकडे पैसे मागत आहेत. अशा प्रकारे कॉन्टॅक्टमधल्या इतर लोकांची व्हाटसअँप हॅक करुन ही टोळी त्यांनाही लुटत होती.
दिल्ली सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी.एस. मल्होत्रा यांनी सांगितलं की, ही टोळी दिल्ली आणि बंगळुरुमधून काम करत होती. पोलिसांनी विदेशी नागरिक चिमेलून इम्मानुएल याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी लॅपटॉप आणि १५ मोबाइल फोन जप्त केले आहे. दिल्ली सायबर सेल सध्या दिल्ली आणि बंगळुरुमधल्या काही भागांमध्ये छापे टाकत आहे.