यावल नगरपरिषद जलकुंभावरील घटना
यावल (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषदेच्या जलकुंभावरील वॉचमनच्या अंगावर दगडफेक केल्याने तसेच, टाकीवरील मधमाशांना दगड मारल्याने त्यांनीही वॉचमनला चावा घेतला. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हर्षल राजू पवार (वय २४, रा. शिवाजीनगर, यावल) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार दि.१२ मार्च रोजी शहरातील एसटी बस स्टॅन्ड जवळील तडवी कॉलनी येथे यावल नगरपरिषदेचा जलकुंभ आहे. या जलकुंभावर अस्थायी कर्मचारी, वॉचमन म्हणून काम करीत असताना तसेच जलकुंभ पाण्याची टाकी भरण्याचे काम करताना तडवी कॉलनीतील संशयित अब्बास पटेल आणि त्यासोबत ३ अनोळखी मुले (नाव गाव माहित नाही) यांनी हर्षल पवार याचे अंगावर तसेच पाण्याच्या टाकीवर असलेल्या मधमाशांच्या मोहोळला सुद्धा दगड मारल्याने आग्या मधमाशांनी त्यांना मोठ्या प्रमाणात चावा घेतला. त्यामुळे हर्षल पवार हे घाई घाईत पाण्याच्या टाकीवरील जिन्यावरून खाली आले. शरीरात तीव्र आग होत असल्याने लागलीच यावल पोलीस स्टेशनला येऊन हकीकत सांगितली. त्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार घेतला. संशयित चार आरोपीविरुद्ध यावल पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.