रावेर तालुक्यातील कुसुंब्यात मालमत्तेच्या वादातून धक्कादायक घटना!
रावेर (प्रतिनिधी ) – तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात कुसुंबा गावात एका व्यसनाधीन मुलाचा खून त्याच्या सख्या बापाने केला आहे. वारंवार होणाऱ्या शेतीच्या आणि मालमत्तेच्या हिश्श्याच्या मागणीवरून झालेल्या वादानंतर बापाने लाकडी मोगरीने मुलांचा खुन केल आहे.
मयत सचिन पाटील वय ३२ असे असुन बाप रविंद्र भगवान पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर ही घटनाकुसुंबा, तालुका रावेर येथे दि.१७ नोव्हेंबर सोमवार रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मयत सचिन हा व्यसनाधीन होता आणि तो त्याचे वडील रविंद्र पाटील यांच्याकडे वारंवार शेती आणि घराच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागत होता. व्यसनामुळे रविंद्र पाटील प्रॉपर्टी देण्यास तयार नव्हते, ज्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. सोमवारी रात्री सचिन दारू पिऊन घरी आला आणि त्याने नेहमीप्रमाणे मालमत्तेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाची वाढल्यानंतर आरोपी रविंद्र पाटील यांनी सचिनला खाली पाडले आणि खोलीतील दोरीने त्याचे हातपाय घट्ट बांधले. त्यानंतर खोलीत ठेवलेल्या लाकडी मोगरीने मुलाच्या डोक्यावर वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची हालचाल थांबली.घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली लाकडी मोगरी, दारूची बाटली, ग्लास आणि स्प्राइटची बाटली आढळून आली.
बापानेच दिली कबुली
मुलगा ठार झाल्यानंतर आरोपी रविंद्र पाटील रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०५ वाजता त्यांनी स्वतः पोलीस पाटील रईस जाफर तडवी यांना फोन करून, “मी माझा मुलगा सचिन पाटील याला माझ्या घरातच मारून टाकले आहे,” अशी माहिती दिली आणि त्यांना घरी बोलावले. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना फोनद्वारे माहिती दिली.
पोलीस पाटील रईस तडवी यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी रविंद्र भगवान पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील आणि ठसे तज्ञ पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पुढील कार्यवाही सुरू केली.
सचिन पाटील हा अविवाहित होता आणि गेल्या तीन महिन्यांपासून कुसुंबा येथे वडीलांकडे राहत होता. त्याला त्याच्या वडीलांनी ऑटो घेऊन दिला होता, जो तो कुसुंबा ते रावेर प्रवाशी भाड्याने चालवत होता.









