डॉ. नितीन विसपुते लिखित पुस्तकाचे डॉ. प्रकाश, डॉ मंदाताई आमटे यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव ( प्रतिनिधी ) – समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर उपाय शोधत, जनजागृतीचा दीप पेटवणारे चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव यांनी आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. या केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते लिखित “व्यसनमुक्तीवर बोलू काही” या पुस्तकाचे लोकार्पण पद्मश्री व मॅगेसेसे पुरस्कार विजेते आदरणीय डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्याहस्ते दि. ७ ऑक्टोबर रोजी हेमलकसा येथे संपन्न झाले.
*पुस्तकाचे अवलोकन केल्यानंतर डॉ. आमटे म्हणाले, या पुस्तकात सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत व्यसनमुक्तीविषयी उपयुक्त माहिती आणि प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती कार्याला नक्कीच बळ देईल आणि जनजागृतीस हातभार लावेल, असा मला विश्वास आहे. व्यसनमुक्त राहण्यासाठीचा संदेश देताना डॉ. आमटे यांनी आपल्या अनुभवातून प्रेरक विचार मांडले. १९७५ साली आम्ही हेमलकसाला आलो, तेव्हा वीज नव्हती, रस्ते नव्हते, आणि भाषेचाही अडथळा होता. तरीही आम्ही इथे राहिलो, काम सुरू ठेवलं. आज पन्नास वर्षांनंतर जे परिवर्तन दिसतंय त्यामागचं एकच कारण आहे. स्वतःशी प्रामाणिक बांधिलकी केली, तर काहीही साध्य करता येतं, असे ते म्हणाले.
*आदिवासी समाजाच्या जीवनशैलीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, या समाजाच्या गरजा मर्यादित असल्यामुळे ते नेहमी आनंदी राहतात. ते प्रामाणिक आहेत, चोरी करत नाहीत. त्यांचं जीवन समाधानात आहे. प्राणी संग्रहालयातील अनुभव सांगताना डॉ. आमटे म्हणाले, मी वाघासोबत राहतो, त्याच्याशी खेळतो. यात काही ट्रिक्स नाहीत. लहानपणापासून दाखवलेलं प्रेमच त्यामागचं कारण आहे. प्राणी कधीच प्रेम विसरत नाही; तो फक्त Self Protection साठी हल्ला करतो. माणसांनी सुद्धा हे समजून घ्यायला हवं.”
या सोहळ्याला चेतना विसपुते, डॉ. मनीषा महाजन (मानसोपचारतज्ञ), संदीप सोनार व लताताई सोनार (ज्ञानवेद अबॅकसचे संचालक), प्रशांत विसपुते (अथर्व कॉम्प्युटर्स) आणि सखारामजी मोरे उपस्थित होते.
*डॉ. नितीन विसपुते यांनी सांगितले की, व्यसनमुक्तीच्या सामाजिक कार्यात चेतना व्यसनमुक्ती केंद्राने मागील अनेक वर्षांत प्रभावी कार्य केले आहे. या पुस्तकाद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा क्षण जळगावसाठी आणि चेतना व्यसनमुक्ती परिवारासाठी अभिमानाचा आहे.”