जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त व्यसनमुक्ती दिंडी उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमवार दि. २६ जून रोजी सकाळी चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आयोजित व्यसनमुक्ती दिंडीमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच, व्यसनमुक्ती विरोधी घोषणा देऊन शहरात दिंडीद्वारे जनजागृती केली. दिंडीच्या समारोपावेळी कुठलेच व्यसन न करण्याची विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी प्रतिज्ञा घेतली आहे.
चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सकाळी शिवतीर्थ मैदानावर दिंडीची सुरुवात पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी डीवायएसपी संदीप गावित, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, चेतना व्यसनमुक्ती केंद्रचे संचालक नितीन विसपुते, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. शिवाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे, उर्दू हायस्कूलचे चेअरमन एजाज मलिक, डॉ. अमित चित्ते, संजय विसपुते, मनीषा पाटील, रेखा पाटील, मविपचे प्रा. दिलीप भारंबे, प्रा. शाम पाटील उपस्थित होते.
सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. प्रसंगी, समाजातील वाढती व्यसनाधीनता याविषयी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चिंता व्यक्त केली. व्यसनांमुळे गुन्हेगारीदेखील वाढते. त्यामुळे प्रत्येकाने व्यसन करणे टाळावे असेही ते म्हणाले. त्यानंतर दिंडी शिवतीर्थ मैदान, स्टेडियम चौक, बस स्थानक मार्गे महात्मा गांधी उद्यान येथे समारोप झाला. दिंडीमध्ये व्यसनामुळे होणारे तोटे तसेच संसाराची होणारी राख रांगोळी कशी होते याबाबत सादरीकरण करण्यात आले.
यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी, आम्ही व्यसन करणार नाही,करू देणार नाही अशी शपथ घेतली. दिंडीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. प्रतीक सोनार, महेंद्र सपकाळे, किरण बाविस्कर, मोहित चौधरी, सर्जेराव पाटील, गौरव देशमुख, तुषार ठाकूर, कपिल बुंदे, सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले.