धरणगाव (प्रतिनिधी) – नामांकित फायनान्स कंपनीतून कर्ज मंजूर करून देतो असे सांगून धरणगाव शहरातील एका व्यापाऱ्याची ९ लाख १५ हजार ९८ रुपयांना ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बनावट नावे सांगणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवनराम आनंदराम कुमावत (वय ४२, रा. एमआयडीसी परिसर, धरणगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापाऱ्याचा व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करतात. २७ मार्च पासून त्यांना त्यांच्या मोबाईलवर मीनाक्षी अग्रवाल, आलिया, रुही शर्मा, सुधीर सक्सेना असे वेगवेगळे नाव सांगणाऱ्यांनी जीवनराम कुमावत यांच्याशी संपर्क साधला. नामांकित फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देतो असे खोट सांगून याच कंपनीसह इतर कंपनीच्या पॉलिसी काढण्यास भाग पडून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यांनतर २७ मार्च ते २६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने एकूण ९ लाख १५ हजार ९८ रुपये ऑनलाईन मागवून घेतले. त्याच्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारचे लोन मंजूर न करता फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जीवनराम कुमावत यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यानुसार वेगवेगळे बनावट नावे सांगण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कणसे करीत आहे.