जळगाव ( प्रतिनिधी ) – भावजयीच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या कापूस व्यापाऱ्याचे घर फोडून ३ लाख ७० हजाराची रक्कम चोरांनी लंपास केली. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील या चोरीचा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी काशिनाथ गुजराती (वय-६२) यांच्या वाहिनीचे निधन झाल्याने ते त्यांच्या अंत्यविधीसाठी घोडसगाव येथे गेले होते. घोडसगाव येथे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील कपाटात तीन लाख ७० हजार रुपयांची रक्कम ठेवून कपाटाची चावी एका पिशवीत ठेवली होती. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते त्याच दिवशी दुपारी निमखेडीत परतले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे काढण्यासाठी कपाट उघडले, त्यावेळी त्यांना कपाटात ठेवलेले पैसे नसल्याचे दिसून आले होते. त्यांनी पत्नी व मुलगी यांना विचारणा केली. मात्र त्यांना काही माहिती नसल्याने पैसे चोरीला गेल्याचे त्यांचे लक्षात आले. मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउनि परवीन तडवी करीत आहेत.
काही दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ आली आहे. काही दिवसांपूर्वी कोथळी येथे घरफोडी झाली होती. त्यानंतर बुधवारी कुऱ्हा येथील बंद दुकाने फोडून २ लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आली होती. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.