जळगाव (प्रतिनिधी) – वन्यजीव बहुद्देशीय संरक्षण संस्थेच्यावतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ दि. २८ जुलै रोजी लांडोरखोरी वन उद्यान, वनविभाग जळगाव या ठिकाणी होणार आहे. यानिमित्त दुचाकी रॅली काढण्यात येणार असून हि रॅली मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे जाणार आहे. तेथेही विविध जनजागृती करण्यात येणार आहे.
जळगाव ते चारठाना दरम्यान व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅलीचे १३ वे वर्ष आहे. याचे उदघाटन २८ रोजी सकाळी १०. ३० वाजता लांडोरखोरी वन उद्यान, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जळगाव वनविभाग , उपवनसंरक्षक प्रवीण ए., जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, केंद्रीय पर्यावरण सक्षमीकरण समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, लघुउद्योग भारतीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. २०० व्याघ्र दुतांच्या सहभागातून वन्यजीव संरक्षण संस्था, आणि जळगाव वनविभाग यांच्या सयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे.
दुचाकी रॅलीला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर लांडोरखोरी,शिरसोली नाका, काव्यरत्नावली चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक मार्गे रॅली चे संचलन राहील. शहरातील टॉवर चौकात पथनाट्य, माहिती पत्रक वितरण १२ वाजता होईल. नशिराबाद मार्गे भुसावळ
येथे गेल्यावर माध्यमिक शाळेत जनजागृती पथनाट्य होणार आहे. त्यानंतर भुसावळ उड्डाण पूलाखाली पत्रकार संघातर्फे व्याघ्र दुतांचे स्वागत केले जाईल. वरणगाव येथे जनजागृती पत्रके वाटप केले जाईल. मुक्ताईनगर मार्गे डोलारखेडा येथे ५ वाजता स्वागत होईल. चारठाना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हितगुज करून चटया आणि शालेय साहित्य वाटप होईल.
दुसऱ्या दिवशी २९ जुलै सकाळी १० वाजता चारठाना भवानी मंदिर येथे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे आणि मान्यवरांच्या हस्ते जनजागृती रॅली हिरवी झेंडी दाखवली जाईल. त्यानंतर डोलारखेडा, दुयी, सुकळी, वायला, चारठाना व इतर गावात शाळेत जाऊन पथनाट्य कार्यक्रमाद्वारे माहिती पत्रकांचे वितरण करत दुपारी 4 पर्यंत जनजागृती कार्यक्रम राबविला जाईल. मुक्ताई अभयारण्य का झाले पाहिजे या बद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्यात येईल. संबंधीतांच्या अडचणी समजून घेतल्या जातील. २९ जुलैला सायंकाळी ६ वाजता जळगाव वनविभाग उपवनसंरक्षक कार्यालय येथे समारोप होईल.
वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, वनक्षेत्रपाल नितीन बोरकर जळगाव, वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे आदींनी याबाबत माहिती दिली आहे.