मुंबई (वृत्तसंस्था ) : भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. या झडप भारताचे तीन सैनिक शहीद झाले असून त्यात एक अधिकारी आणि दोन जवानांचा समावेश आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये अशी हिंसक झडप झाली आहे.
भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. गलवान खोऱ्याजवळ सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली, ज्यात एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आलं.
चीनसोबत ही झडप झाल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत लष्करप्रमुख आणि परराष्ट्र मंत्रीही उपस्थित होते.
भारतीय लष्कराकडून जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, “गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री डी-एस्क्लेशनच्या प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. या चकमकीत भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्कर अधिकारी यावेळी या मुद्द्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करत आहेत.”