अमळनेर तालुक्यात मांडळ येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मांडळ येथील एकाने वृत्तपत्रांच्या पार्सलवरून वाद झाल्याने एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना १३ रोजी घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर डेपोतील वाहक भगवान साहेबराव पारधी (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १३ रोजी सकाळी ते अमळनेर-सोनगीर बस घेऊन निघाले. वाहक सिटाखाली नेहमीप्रमाणे वृत्तपत्रांचे बंडल ठेवले होते. सकाळी ७:३० वाजता बस ही मांडळ येथे पोहचली. नेहमी पार्सल उतरवणारा युवराज पाटील हा न येता नवीन २५ ते २८ वयोगटातील इसमाने पार्सल बाबत विचारणा केल्याने वाहक भगवान पारधी यांनी ते पार्सल काढून दिले. मात्र त्या इसमाने ‘तुला पार्सल नीट आणता येत नाही का ? त्यावर तू पाय ठेवून का आणले ?’ असे म्हणत आरडाओरड करू लागला.
वाद वाढल्याने त्याने वाहकाला शिवीगाळ करत कॉलर पकडून बाहेर ओढत चापट बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू मांडळ रूटला कशी ड्यूटी करतो तेच पाहतो असे म्हणत धमकी दिली. वाहक भगवान पारधी यांनी पोलिस पाटील यांना बोलावले असता सदर मारहाण करणाऱ्याचे नाव महेश नामदेव ठाकूर असल्याचे त्यांनी सांगितले. वाहकाने ड्यूटी करून परतल्यावर वाहतूक निरीक्षक यांना सदर घटना कळवली व मारवड पोलिसांत शासकीय कामकाजात अडथळा आणत मारहाण केल्याप्रकरणी महेश नामदेव ठाकूर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून पुढील तपास हेकाँ सुनील पाटील हे करीत आहेत.