अमळनेर येथील बसस्थानकातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : बसमध्ये चढत असताना अचानक चालकाने बस मागे घेतल्याने महिलेच्या पायावरून चाक गेल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता आगारात घडली.याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशीलाबाई निंबा पाटील (वय ७५, रा चौबारी ता. अमळनेर) ही महिला चष्मा घेण्यासाठी अमळनेर येथे गुरुवारी आली होती. दुपारी ३ वाजता ती गावी परत जाण्यासाठी बसस्थानकावर आली तेव्हा शिरपूर बस लागली होती. महिला दरवाज्याला हात लावून बसमध्ये चढत असताना वाहक आणि चालक यांनी पूर्वसूचना न देता अचानक बस मागे घेतली. त्यामुळे तिला दरवाज्याचा धक्का लागून तिचा डावा पाय चाकाखाली आल्याने फ्रॅक्चर झाला. तिला उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले. पोलिसांनी तिचा जबाब घेतल्यावरून शिरपूर बसच्या चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.









