जळगावात भरदिवसा साखळी चोरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील महाराणा प्रताप हायस्कूलच्या समोरील रस्त्यावर भरदिवसा दुचाकीस्वार चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी निर्मला जनार्दन चौधरी (वय ६८, रा. प्रेम नगर, जळगाव) या ३० जानेवारी रोजी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास आपले पती आणि भाऊ वासुदेव धांडे यांच्यासह बेडाळे नगर येथून जेवण करून पायी घराकडे जात होत्या. त्या महाराणा प्रताप हायस्कूलजवळील डॉ. पाध्ये यांच्या घरासमोरील रस्त्यावरून जात असताना, मागून एका दुचाकीवर दोन अज्ञात इसम आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने निर्मला यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची आणि ९० हजार रुपये किमतीची सोन्याची काळी मण्यांची पोत जोरात हिसकावून घेतली. त्यानंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरून महाराणा प्रताप हायस्कूलच्या मागील बाजूने सुसाट वेगाने पसार झाले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निर्मला चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास च-हाटे करीत आहेत. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.









