जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जयहिंद कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त लिपिक यांना खोटी कोर्टाची ऑर्डर व खोटे कागदपत्रे व्हॉटसॲपवर पाठवून धमकी देत त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तब्बल १८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर शनिवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात राहुल गुप्ता व संदीपराव असे नाव सांगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील जयहिंद कॉलनी परिसरामध्ये ६४ वर्षीय सेवानिवृत्त लिपिक हे कुटुंबासह वास्तव्याला आहे. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीपराव असे नाव सांगणाऱ्या दोघांनी व्हाट्सअपवरून संपर्क साधून वारंवार धमकी देत कोर्टाची ऑर्डर व इतर खोटे कागदपत्रे व्हाट्सअपवर पाठवले. त्यानंतर वृद्धाने विश्वास ठेवला. त्यानंतर वृध्दाकडून ऑनलाइन पद्धतीने तब्बल १८ लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून स्वीकारून त्यांची फसवणूक केली आहे.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने शनिवारी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीपराव असे नाव सांगणारा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.