भुसावळ शहरातील तापी नगरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील तापी नगरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १९ लाख ४०५ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (वय-६५ रा. तापी नगर, भुसावळ) हे वृद्ध सेवानिवृत्त आहेत. दि. १० मार्च ते ६ डिसेंबर २३ च्या दरम्यानच्या काळात जळगाव येथे राहणारे संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ असे सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार केले.
हे कागदपत्र त्यांच्या घरी आणून अपहार केला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय विजय गायकवाड हे करीत आहे.