भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वरणगाव शहरातील महाराष्ट्र बँकेसमोरून एका अज्ञात चोरट्याने एका वृद्ध व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून ९० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवार, २२ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोपान गोविंदा इंगळे (वय ६९, रा. मकरंद नगर, वरणगाव) असे या वृद्धाचे नाव आहे. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते महाराष्ट्र बँकेत गेले होते. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यांनी ९० हजार रुपये एका पिशवीत भरले आणि ती पिशवी दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते घराकडे निघाले. बँकेतून निघाल्यावर थोड्याच अंतरावर एका अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले. काहीतरी बोलण्याच्या बहाण्याने त्या चोरट्याने त्यांची नजर चुकवली आणि दुचाकीच्या डिक्कीतील पैशांची पिशवी घेऊन पोबारा केला.
हा प्रकार इंगळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ वरणगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार नागेंद्र तायडे करत आहेत.