जळगाव (प्रतिनिधी) – येथील खेडी रोड येथील ज्ञानदेव नगर परिसरातील रहिवासी वृद्धाचा दोन ते तीन दिवसांपूर्वी राहत्या घरात मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील भागवत जावळे (वय – ६५, रा. ज्ञानदेव नगर) असे मयत इसमाचे नाव आहे. आजूबाजूच्या नागरिकांना घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी सुनील जावळे यांच्या घराकडे पाहिले. मात्र दार आतून बंद होते व कोणीही उघडत नव्हते. तात्काळ एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर सदर वृद्ध हा मयत अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह खराब अवस्थेत होता. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत सुनील जावळे याच्या पश्चात पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे. तो सुमारे २० वर्षांपासून एकटाच राहत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. एका भेळ भत्ता गाडीवर ते कामाला असल्याची माहिती मिळाली.