जळगावात हायवेदर्शन कॉलनीत पोलिसाच्या आईसोबत घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मंदिरातून घरी येत असलेल्या ८५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सोनपोत लांबवली. ही घटना मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपामागील हायवेदर्शन कॉलनीत घडली. पोत ओढतांना वृद्ध महिला रस्त्यावर कोसळून फरफटल्याने जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
जिल्हा पोलीस दलातील दहशतवाद विरोधी शाखेमध्ये कार्यरत असलेले उपनिरीक्षक भाऊसाहेब काशीनाथ पाटील हे हायवेदर्शन कॉलनीत वास्तव्यास आहे. त्यांची आई शेवंताबाई काशीनाथ पाटील (वय ८५) या नेहमीप्रमाणे त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या टिळक नगरातील विठ्ठल मंदिरात गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या रस्त्याने घराकडे येण्यासाठी निघाल्या. घरी जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असतांना मागून भरधाव वेगाने दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. त्यांनी पुढे जावून काही अंतरावर दुचाकी थांबवली. पुन्हा ते वृद्ध महिलेच्या दिशेने गेले आणि दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातून सोन्याची पोत ओढून नेली.
सोनपोत ओढल्यामुळे वृद्ध शेवंताबाई पाटील या रस्त्यावर कोसळून फरफटल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी येत असल्याचे दिसताच चोरटे तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दुचाकीवरुन दोन चोरटे सोनसाखळी चोरतांना कैद झाले आहे. पोलिसांनी ते फुटेज हस्तगत केले असून त्यानुसार संशयितांचा शोध घेतला जात आहे.