जळगाव (प्रतिनिधी) – शिक्षक हा पिढीला दिशा आणि आत्मविश्वास देण्याचे पवित्र कार्य सतत करीत असतो. निसर्ग नियमाप्रमाणे मनुष्य हा सतत शिकत राहणारा समाज घटक आहे.प्रारंभी आई-वडिलांकडून त्यानंतर शिक्षक आणि पुढे त्याला मिळणाऱ्या जीवन अनुभवांमधून तो शिकतच असतो. माणसाच्या या शिक्षण प्रवासात शिक्षक त्याला योग्य मार्ग दाखवतो. तो सारासार विचार करण्याची दृष्टी आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो.केवळ पुस्तकी ज्ञान देवून खऱ्या शिक्षकाचे समाधान होत नाही तर अनुभवनिष्ठ आणि तर्काधारित विचार कसा करावा याचे बाळकडू देखील तो आपल्या विद्यार्थ्यांना देतो. समाजात आसपास ज्या वेगवेगळ्या भ्रम निर्माण करणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या गोष्टींचा पेव फुटला आहे, त्यातून नव्या पिढीला बाहेर काढण्याची सकारात्मक क्षमता शिक्षकांमध्येच आहे.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ.जयेंद्र लेकुरवाळे (अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव) यांनी शिक्षक दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमात केले.
सभागृहात बोलतांना त्यांनी आपल्या भारतीय संस्कृती आणि इतिहासातील शिक्षण व्यवस्था,गुरु-शिष्य परंपरा, आधुनिक काळात सतत बदलत गेलेली शिक्षणाची आणि शिक्षकांची भूमिका, तसेच सद्यकालीन अवस्था याविषयी विविध उदाहारणे दिलीत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांनी शिक्षण प्रक्रीयेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर आपले विचार मांडलेत. सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये, त्यांच्यात विधायक मूल्य विकसित करण्यामध्ये शिक्षकांचे जे काही महत्वाचे योगदान आहे, त्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या आरंभी विद्यार्थ्यांनी सभागृहात उपस्थित शिक्षकांचा गुलाबपुष्प देवून सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय लोहार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.