जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मेहरूण भागात विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. १९ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी शासकीय रुग्णालयात केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुभांगी कुणाल नाईक (२५, रा. आदित्य चौक, मेहरुण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. (केसीएन)घटना उघडकीस आल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विवाहितेची आई, वडील, भाऊ व अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहचले.
सहा वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाल्यापासून तिला सासरचे मंडळी त्रास देऊन सतत छळ करीत होते. तिला माहेरील मंडळींशी बोलू देत नव्हते व येऊदेखील देत नव्हते.(केसीएन) मध्यंतरी सासरच्या मंडळींनी शुभांगीला माहेरी आणून सोडले. त्यानंतर चारच दिवसात तिला घेऊन गेले. तिला होणाऱ्या त्रासामुळे तिला पाठवित नव्हतो, मात्र काही जणांनी मध्यस्थी केली व पाच वर्षांच्या मुलासाठी मुलीला पाठविले, असे शुभांगीचे वडील राजेंद्र भागवत वाघ (रा. पिंपळा, ता. सोयगाव) यांनी सांगितले.