जळगाव शहरातील खेडी रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पाणीपुरी खाण्यासाठी पायी जात असलेल्या विवाहितेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यानी ११ ग्रम वजनाचे मंगलपोत अंधाराचा फायदा घेऊन जबरीने चोरुन नेली. ही घटना गुरुवारी ९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावर घडली. याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील खेडी ब्रुदूक येथे सपना भूषण पवार या विवाहीता वास्तव्यास आहे. गुरुवारी ९ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्या जेठाणी स्वाती पवार व मुलगी रियांशू यांच्यासोबत गावातून कालंका माता चौफुलीजवळ फिरण्यासाठी आणि पाणीपुरी खाण्यासाठी जात होत्या. यावेळी शंभरफुटी रस्त्यावरील हॉटैल शामबा पॅलेस समोरून पायी जात असतांना एक अनोळखी दुचाकीस्वार तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या समोर आला. त्याने सपना पवार यांच्या गळ्यावर जोरात हात मारुन त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरीने ओढून तो अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला.घाबरलेल्या महिलेने कुटुंबियांना माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी १० जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.