जळगाव ( प्रतिनिधी ) – विवाहानंतर पतीच्या नोकरीच्या गावी सिल्वासा येथे गेल्यानन्तर व्यसनी पतीकडून विनाकारण मानसिक आणि शारीरिक छळ करीत चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या व गळा दाबून मारण्याचीही धमकी देणाऱ्या पतीविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जळगावातील रामेश्वर कॉलोनीतील हनुमान नगरात सध्या माहेरी राहत असलेली विवाहिता वर्षा राहुल शेळके यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की , त्यांचा विवाह ३० जून २०२० रोजी पथराड ( ता – भडगाव ) येथील मूळ रहिवाशी राहुल रावसाहेब शेळके यांच्याशी पथराड येथे झाला होता . लग्नानन्तर ५ महिने त्या पथराड येथे सासू – सासऱ्यांकडे राहत होत्या . त्यांचे पती राहुल शेळके आणि दीर प्रमोद शेळके हे रखोली (सिल्वासा, दादरा – नगर हवेली केंद्र शासित प्रदेश ) येथे आर आर केबल्स नावाच्या कंपनीमध्ये नोकरीला असल्याने नंतर त्या पतीसोबत राहायला सिल्वासा येथे गेल्या होत्या. तेथे १८ नोव्हेंबर २०२० ते २३ एप्रिल २०२१ या कालावधीत त्यांचा दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनी पतीकडून विनाकारण मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. पती त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. २३ एप्रिल २०२१ रोजी त्यांना मोबाइल चार्जरच्या वायरने गळा दाबून जीव घेईन अशी धमकी त्यांना आरोपी पतीने दिली होती. आपला नवऱ्याकडून छळ होत असल्याचे आपल्या आई – वडिलांना नातेवाईकांकडून समजल्यावर २४ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे वडील सिल्वासा येथे गेले आणि आपल्याला माहेरी जळगावला घेऊन आले तेंव्हापासून आपण माहेरी राहत आहोत. ८ मे २०२१ रोजी पहाटे ६ वाजता दारूच्या नशेत पती राहुल शेळके जळगावला माझ्या माहेरी आला होता, तेंव्हा त्याने मारहाण करीत तू इकडे आलीच कशी ? बघ आता तुझे काय करतो , अशी धमकीही दिली होती.
आरोपी पती राहुल शेळकेंच्या विरोधात या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात भा द वि कलम ४९८ – ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे कॉ संजय धनगर करीत आहेत.