चाळीसगाव शहरातील घटना, दोन तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- सर्वत्र तुळशी विवाह सुरु होताच, चोरटयांनी देखील त्यांची “ड्युटी” सुरु केली आहे. लग्न समारंभात वर्हाडींची धावपळ सुरू असताना वधूच्या आईकडील दागिण्यांची पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील एका हॉटेलमध्ये उघडकीस आहे. या पर्समध्ये नवरीचे सुमारे सात लाखांचे दागिने होते. चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकत दागिने हस्तगत केले.
चाळीसगावच्या हॉटेल कलमशांती पॅलेसमध्ये सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचे लग्न गुरुवार,७ रोजी झाले. देशपांडे यांच्याकडे नवरीचे सोन्याचे दागिणे, रोख रुपये व अॅपल कंपनीचा आयफोन होता. हा सर्व ऐवज त्यांनी एका पर्समध्ये ठेवला होता. नातेवाईकांच्या गाठी-भेटी सुरू असताना टेबलावरून अज्ञात चोरट्याने ही पर्स लांबवली. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी त्यांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी त्यांची तपासचक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्हीद्वारे संशयित चोरटा निष्पन्न केला. गोपनीय माहितीवरून चोरट्याला कोदगाव चौफुलीजवळ ताब्यात घेत त्यास अटक केली. बालवीर माखन सिसोदिया (१९, रा.गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी यांच्या पथकाने हि कारवाई केली.