पुणे येथील शून्य क्रमांकावरील गुन्हा पाचोरा पोलीस स्टेशनला वर्ग
पाचोरा (प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीचा विवाह करणे सासरच्यांसह आई-वडिलांच्या अंगलट आल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित तरुणी गरोदर असल्याने पतीसह सासू, सासरा व आई-वडील यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ८ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान अल्पवयीन मुलीची आई रेखा सुनील रेड्डी, वडील सुनील काशिनाथ रेड्डी (वय ४५, रा. आदर्श, इंदिरानगर, येरवडा, पुणे), सासू सुरेखा भालचंद्र मुसळे (वय ५०), सासरे भालचंद्र जगन्नाथ मुसळे (वय ५६, रा. तलाठी कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा) यांनी विवाहावेळी मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही वाल्मीक भालचंद मुसळे (वय २८) याच्याशी सर्वसंमतीने विवाह लावून दिला. दोघांत शारीरिक संबंध आल्याने अल्पवयीन मुलगी ही ९ महिन्यांची गरोदर असल्याची फिर्याद येरवडा (पुणे) येथील पोलीस ठाण्यात दिल्याने शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला.
आता पाचोरा येथील पोलीस ठाण्यात कागदपत्रे प्राप्त झाल्याने संशयित पती वाल्मीक मुसळे, सासू सुरेखा मुसळे, सासरा भालचंद मुसळे (सर्व रा. तलाठी कॉलनी, पाचोरा), विवाहितेची आई रेखा रेड्डी व वडील सुनील रेड्डी (दोन्ही रा. आदर्श इंदिरानगर, येरवडा, पुणे) यांच्याविरुद्ध पाचोरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.