जळगाव तालुक्यातील विटनेर येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – नापीकीला कंटाळलेल्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना शनिवार दि. २५ रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवदास रामा पाटील (वय ३५, रा. विटनेर, ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. विटनेर येथे शिवदास पाटील हे वास्तव्यास होते. शेती करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. परंतू शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून विवंचनेत होते. दरम्यान, दिवाळी निमित्त शिवदास पाटील यांच्या पत्नी मुलाला घेवून माहेरी गेलेल्या होत्या.
त्यामुळे शिवदास पाटील हे आईसोबत घरी होते. शनिवारी रात्री त्यांची आई घराबाहेर बसलेली असतांना शिवदास पाटील यांनी घरातील लाईट बंद करुन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. मृतदेह बघताच आईने हंबरडा फोडीत एकच आक्रोश केला. विटनेरचे पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून तो शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. घटनेमुळे विटनेर गावात शोककळा पसरली आहे रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.









