विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल ठेवला कायम
जळगाव: तालुक्यातील विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र ठरविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय नाशिकच्या अपर विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला आहे. यामुळे सदस्य सागर ईश्वर दिवाणे आणि अर्चना दिनेश भगत या दोघांना आपले सदस्यत्व गमवावे लागले आहे.


विटनेर येथील रहिवासी सुरेश बाबुलाल गोलांडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४ (१) (ज-३) नुसार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी असा आरोप केला होता की, ग्रामपंचायत सदस्य सागर दिवाणे आणि अर्चना भगत यांनी सार्वजनिक व शासकीय जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दोन्ही सदस्यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले होते.
विभागीय आयुक्तांकडील सुनावणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात सागर दिवाणे आणि अर्चना भगत यांनी नाशिकच्या अपर विभागीय आयुक्तांकडे अपील (क्र. ४५/२०२५) दाखल केले होते. ६ मार्च २०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची पडताळणी केली.
तपासणीत आढळलेले निष्कर्ष
सागर ईश्वर दिवाणे : भूमी अभिलेख कार्यालयाने केलेल्या मोजणीनुसार, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ८९.५० चौरस मीटर जागेव्यतिरिक्त २७ चौरस मीटर सार्वजनिक बखळ जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच, त्यांनी स्वतः अतिरिक्त बांधकाम पाडल्याचे मान्य केल्याने अतिक्रमण सिद्ध झाले, असे न्यायालयाने नमूद केले.
अर्चना दिनेश भगत : त्यांच्या मालकीच्या १९७ चौरस फूट क्षेत्राऐवजी प्रत्यक्ष मोजणीत ४८३ चौरस फूट बांधकाम आढळले. त्यांनी २६.४९ चौरस मीटरचे बेकायदेशीर बांधकाम केल्याचे अहवालावरून समोर आले आहे.
न्यायालयाचा अंतिम आदेश
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणारी व्यक्ती सदस्य राहण्यास पात्र नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मूळ आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत विभागीय आयुक्तांनी अपिलार्थींचे अपील फेटाळून लावले. या निकालामुळे आता दोन्ही सदस्यांची पदे अधिकृतपणे रिक्त झाली आहेत.









