गो.से. हायस्कूलच्या दिंडीने वेधले पाचोरा शहराचे लक्ष
पाचोरा (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त व जागतिक साक्षरता आणि आरोग्य दिनानिमित्त पाचोरा शहरात गो.से हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य अशी दिंडी काढून पाचोरा शहराचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थिनी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षारोपणाचा संदेश दिला. यावेळी पाचोरा शहरातून भडगाव रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, माजी आ. दिलीप वाघ यांचे निवासस्थान, चेअरमन संजय वाघ यांचे निवासस्थान येथून गणेश कॉलनी व थेपडे नगर येथून रॅली संपन्न झाली.
रॅलीमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला. तसेच साक्षरता व आरोग्य दिनाच्या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या निवासस्थानी दिंडीचे पूजन व विठ्ठल रुक्माई, ज्ञानदेव, तुकाराम यांच्या वेशभूषेतील कलाकारांचे पूजन ज्योती वाघ, चेअरमन संजय वाघ व त्यांच्या कुटुंबतर्फे पालखी पूजन करण्यात आले. तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी माजी नगरसेविका सुचिता वाघ व त्यांच्या परिवारातर्फे दिंडीचे व पालखीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गोल रिंगण करून तालासुरात विठ्ठल नामाची लेझीम पथक टाळ मृदंग वाद्य यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लक्ष्मी माता वारकरी संप्रदायाचे ह.भ.प योगेश महाराज व त्यांच्या वारकरी विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन दिंडीचे शोभा वाढवली. शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, संगीत शिक्षक, कलाशिक्षक, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.