* करोना म्हणणार आता, बाय बाय जळगाव
* जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कौतुकास्पद कार्य
विश्वजीत चौधरी
जळगाव – जिल्हाभरात प्रशासनाविषयी वाढणारे संभ्रमाचे वातावरण…त्यात करोना साथरोगाचे वाढते आक्रमण…जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडायला आलेली…खाजगी दवाखाने बंद…मृत्युदर वाढून जिल्ह्याचे नाव देशभर बदनाम…अत्यंत बेपर्वा व टीकेचे धनी ठरीत असलेले जिल्हा प्रशासन…अन त्यात मग “पी.टी.मास्तरा”ची एन्ट्री होते आणि अवघ्या १०० दिवसात जिल्ह्यात सक्षम व शाश्वत आरोग्य यंत्रणा उभी राहते…अन चक्क जणू करोनाच म्हणतोय कसा, बाय बाय जळगाव…होय, हे घडलेय, आपल्या जळगाव जिल्ह्यात.
आज जिल्ह्यात ८१ टक्के रुग्ण बरे झाले आहे. मृत्यूदर २.४७ टक्के असा कमी झाला आहे. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कारभार हाकणे जिल्हाधिकारी पदाच्या व्यक्तीला तितके सोपे नाही. मात्र शिस्तबद्ध नियोजन, संयमी नेतृत्व आणि अभ्यासू वृत्तीने परिस्थिती हाताळली तर कोणतीही समस्या सोडविणे सोपे होते. हेच घडवून आणले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी. भुसावळ येथील मालती नेहेते या करोनाबाधित बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह १० जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला होता. या बेपर्वा कारभारामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह ५ जण निलंबित झाले होते. तसेच मृत्यूदर देखील वाढला होता. प्रशासनाचे नियंत्रण राहिले नव्हते. त्यामुळे जळगावचे नाव देशपातळीवर कुप्रसिद्ध झाले होते. एखाद्या खमक्या अधिकाऱ्याची येथे आवश्यकता होती.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी राज्य शासनाने नवीन अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. त्याच्या आठच दिवसात येथील जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी होऊन नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती राज्य शासनाने केली. त्यांनी १८ जून २०२० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याचा पदभार स्वीकारला.
३२ वर्षीय अभिजित राऊत यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला. मुळचे विदर्भीय असलेले अकोलाचे रहिवासी अभिजीत राऊत यांची जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच कारकीर्द जळगावला सुरु झाली. पहिले लक्ष्य अर्थातच करोना निर्मूलनाचे. दुसऱ्याच दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात त्यांनी भेट घेतली. परिस्थिती जाणून घेतली. उणीवा डॉ. रामानंद यांच्याकडून समजून घेतल्या. जिल्हाभरात करोना साथरोगाचा आढावा घेऊन संबंधित प्रांत, तहसीलदार व इतर सरकारी यंत्रणेसह वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानुसार आवश्यक मनुष्यबळ उभारणे, उपलब्ध व प्रस्तावित निधीची कमतरता आणि सुविधांचा पुरवठा हे तीन आव्हान पेलत त्यांनी संयमाने पाठपुरावा करीत आरोग्य यंत्रणेला सक्षम करून दाखविले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर ते जळगावात बदली होऊन आले होते. सांगलीत मागील वर्षी प्रचंड आणि जीवघेणा पूर आला होता. त्यावेळी या आपत्तीला सीईओ म्हणून ग्रामीण भागात त्यांनी धैर्याने हाताळले होते. तेथे त्यांचे कौतुक झाले होते. सांगली येथील पूर स्थिती हाताळणारे जिल्हाधिकारी राऊत यांनी करोना साथरोगामुळे बदनाम झालेली जळगावची परिस्थिती आज पूर्णपणे बदलवली आहे.
आज जिल्ह्यात ८१ टक्के रुग्ण बरे झाले आहे. मृत्यूदर २.४७ टक्के असा कमी झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी लेखापरीक्षण, मृत्यू परीक्षण, टास्क फोर्स समिती यांवर अधिक भर दिला. जे सामान्य रुग्णालय कधी असुविधांचे आगार होते त्याचे रुपडे पालटले. कोविड रुग्णालय म्हणून घोषित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात “ऑपरेशन कोविड” साठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे हात बळकट केले. या कोविड रुग्णालयात अनेकदा जिल्हाधिकारी राऊत यांनी “सरप्राईज व्हिजीट” दिल्या. येथे तब्बल ४०० पेक्षा अधिक ऑक्सिजन बेड उभारून उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली. कोविड रुग्णालयासह जिल्ह्यातील कोविड दक्षता केंद्रात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा नियमित करण्यासाठी नियोजन केले. त्यासाठी समिती गठीत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन, काही गावांत जाऊन करोनाविषयी आढावा घेत विचारपूस केली. यात सातत्य ठेवले. तालुक्यांमध्ये आरोग्य यंत्रणेच्या प्रत्येक घटकाशी चर्चा करून करोना आटोक्यात आणला. मनुष्यबळ उभारून त्यांच्या वेतनाचा प्रश्नहि मार्गी लावला.
जिल्हाधिकारी कार्यालयात वॊर रूम उभारली. खाजगी डॉक्टरांच्यादेखील बैठका घेतल्या. त्यांना सूचना केल्या. ”माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेतून आणि त्याआधी देखील विविध सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक आणि आशा कर्मचारी यांच्या सहकार्याने सर्व्हेक्षण पूर्ण केले. नमुना संकलनासाठी अँटीजेन कीटची, विविध औषधांची उपलब्धता करून दिली. बोगस डॉक्टर मोहीम उघडली.
आवश्यक वाटली म्हणून ७ ते १३ जुलैदरम्यान करोनाचा धुमाकूळ असलेले टॉप थ्री शहरात (जळगाव, अमळनेर, भुसावळ) टाळेबंदी लावली. जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळगाव शहरातील व्यापाऱ्यांचा मार्केट उघडण्याचा विषय मोठ्या संयमाने हाताळला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन घेतले. त्यामुळे शासकीय सुविधा आणि योजनांचा लाभ जिल्ह्यासाठी करून घेतला. विविध मोहीम राबविल्या.
जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यात करोना नियंत्रणासह महसूल व कृषीचे महत्वाचे विषय हाताळले. जिल्ह्यात पावसामुळे अनेक शेतक-यांचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मागील महिन्यात एका मुलाखतीत त्यांनी, जिल्हाधिकारी हे पी.टी.चे शिक्षकासारखे असतात असे वक्तव्य केलेले होते. हे वाक्य त्यांना लागू होते. अष्टपैलू भूमिका त्यांनी पार पाडली. नागरिक ते थेट जिल्हाधिकारी असा संवाद देखील अनेकवेळा घडून आल्याने अनेकांच्या समस्या सुटल्या. शंकांचे निरसन झाले. तरी आज जिल्ह्याच्या वतीने सांगावेसे वाटते, करोना निर्मूलनाचे कार्य अंतिम टप्प्याकडे जरी जात असले तरीही नागरिकांनी गाफील न राहता मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे व हात धुणे या तीन बाबी नियमित ठेवाव्या. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात राज्यात जळगावचा दुसरा क्रमांक आला. मुख्यमंत्र्यांकडून राऊत यांचे कौतुक झाले. ही गौरवास्पद बाब आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल संवाद साधला असता ते म्हणाले की, कोव्हीड साथरोगाचा प्रादुर्भाव रोखणे व त्वरित निदान व उपचार उपलब्ध करणे यात जिल्ह्यातील सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी व समाजसेवी संस्था यांनी एकत्र येऊन “जळगाव पॅटर्न” उभा केला आहे. हा पॅटर्न कोण्या एका व्यक्तीचा नसून जळगावकर जनतेचा पॅटर्न आहे. आगामी काळात कोविड नियंत्रणासाठी याच मार्गाने आपण जाणार आहोत.
कोव्हिड मुळे विकास कामांची अमलबजावणी मागे पडली आहे, ती भरून काढणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प यांची यादी व सद्यस्थिती याबाबत पूर्वतयारी सुरू असून आगामी काळात त्यावर विशेष भर देण्यात येईल. मूलभूत सुविधांचा विकास तसेच वंचित समाजघटकांसाठी व दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.