जळगाव शहरातील अयोध्या नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- घरी जेवण झाल्यानंतर बाहेर जाऊन विष प्राशन करीत घरी आल्यावर तरुणाला अत्यवस्थ वाटू लागले. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश लीलाधर वाघोदे (३२, रा. आयोध्यानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. एका कंपनीत कामाला असलेला योगेश वाघोदे हा तरुण आई, पत्नी व मुलासह आयोध्यानगरमध्ये राहत होता. सहा महिन्यांपासून त्याची पत्नी मुलासह माहेरी गेलेली आहे. मंगळवारी या तरुणाने आईसोबत जेवण केले व नंतर तो बाहेर गेला. काही वेळाने तो घरी आला. दारात बसलेल्या आईजवळ बसला. काही वेळाने त्याला उलट्या होऊ लागल्याने आईने इतरांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मंगळवारी दि. १३ रोजी १२. ४० वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.