मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रवेश, जळगाव शहरात राजकीय समीकरणे बदलणार
जळगाव (प्रतिनिधी) :- शहर विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या अवघ्या एक दिवस अगोदर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकीने राजीनामा दिला आहे. दरम्यान, भंगाळे यांनी शिवसेना शिंदे गटात मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. आज घडलेल्या या नाट्यमय घडामोडीने शिवसेना (उबाठा) गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलणार असून पुढील महानगरपालिकेत वेगळेच चित्र दिसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका उद्या दि.२० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राज्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. (केसीएन)जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आ. राजूमामा तथा सुरेश भोळे हे तिसऱ्यांदा उमेदवारी लढवत आहेत. जळगाव जिल्हा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी राजीनामा दिला असून शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. तर विष्णू भंगाळे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गट आणखी मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तर विष्णू भंगाळे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे आभारी आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देऊन मला सन्मान दिला. आज सकाळी संपर्कप्रमुख संजय सावंत मला म्हणाले की, तू काही काम करीत नाही. आज माझ्या भावावर पुणे येथे सकाळी बायपास झाले.(केसीएन)माझा परिवार तेथे होता. आणि मी पक्षासाठी प्रचारात होतो. तरीही वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. यामुळे आज शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकल्याचे विष्णू भंगाळे यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, महिला जिल्हा प्रमुख सरिता माळी कोल्हे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.