जळगाव तालुक्यातील वडनगरी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडनगरी गावातून खेडी जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खळ्यात पाच संशयित आरोपींनी एका तरुणाला सरपंच पदासाठी उभा राहिला या कारणावरून लाथा बुक्क्यानी बेदम मारहाण करीत विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे.
दीपक गुलाब गायकवाड (वय २२, रा. वडनगरी ता. जळगाव) असे पीडित तरुणाचे नाव आहे. दीपक गायकवाड यांचा भाऊ गोरख गुलाब गायकवाड हा सन २०२० मध्ये वडनगरी गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभा राहिला होता.(केसीएन) या कारणावरून संशयित आरोपी शशिकांत प्रल्हाद सोनवणे, मृणाल भुवन पाटील, अनिल प्रल्हाद सोनवणे, कल्याण उत्तम पाटील, भुवन प्रभाकर पाटील (सर्व रा. वडनगरी ता. जळगाव) यांचा त्याच्यावर राग होता. यामुळे या संशयित आरोपींनी फिर्यादी दीपक गायकवाड याला जीवे ठार मारण्याचा कट रचला. मृणाल पाटील यांचे वडनगरी गावातून जाणाऱ्या खेडी रस्त्यावर खळ्यामध्ये बोलावून जातिवाचक शिवीगाळ केली.
तसेच जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. संशयित आरोपी शशिकांत सोनवणे व मृणाल पाटील यांनी बळजबरीने विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला शुक्रवार दि. २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी संदीप गावित हे करीत आहेत.