राजकारणाच्या नव्या इनिंगचा शुभारंभ; हजारो समर्थकही पक्षात दाखल
मुंबई (वृत्तसेवा) : – शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाचोरा – भडगाव मतदार संघाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून या माध्यमातून त्या राजकीय क्षेत्रातील नवीन इनिंग सुरू करत आहेत.

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील मातब्बर राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणाऱ्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात पक्षात प्रवेश घेतला. प्रवेश घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आणि त्यांची सदिच्छा भेट व आशीर्वाद घेऊन ताईंनी प्रवेश केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत केले. याप्रसंगी वैशालीताई यांच्यासोबत त्यांच्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत करतांना त्यांच्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात पक्षाची ताकद आता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी वैशालीताईंच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील त्यांचे स्वागत केले.
भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपण आज भाजपमधून नवीन वाटचाल सुरू करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, माझे पिताश्री आर. ओ. पाटील यांनी दोनदा युतीचे आमदार म्हणून जनसेवेचा मापदंड प्रस्थापित केला होता. त्यांचा वारसा नेटाने पुढे नेण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. वडिलांचा जनसेवेचा वारसा कायम राखत आपली वाटचाल असेल असे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
या प्रवेश सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, मंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चिटणीस विजयभाऊ चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी पाचोरा येथील भाजपाचे माजी आमदार दिलीप वाघ, , अमोल शिंदे, मधुकर काटे, डी एम पाटील, सुभाष मुंडे, बंशीलाल पाटील, प्रदीप बापू पाटील, अनिल पाटील, गोविंद शेलार हे आवर्जून उपस्थित होते.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांची नावे
यात प्रामुख्याने योजनाताई पाटील तालुका प्रमुख-भडगाव, लक्ष्मी तुषार पाटील तालुका प्रमुख-पाचोरा, राजेंद्र देवरे, पप्पू पाटील वडजी, शरद रमेश पाटील वेरुळी तालुका प्रमुख-पाचोरा, रतनसिंग मानसिंग परदेशी बांबरुड-विधानसभा क्षेत्र प्रमुख, अनिल देशमुख सारोळा उपतालुका प्रमुख -पाचोरा, प्रमोद सुधाकर पाटील, मनोहर चौधरी भडगांव, अधिकार पाटील सांगवी प्र.लो. – सरपंच, पंढरी पाटील कुरंगी, मिथुन वाघ राणीचे बांबरुड, मुकेश पाटील-खडकदेवळा, प्रदीप बोरसे – शिंदाड, वर्षाताई सागर वाघ राणीचे बांबरुड, रंजनाताई पाटील भडगांव, शिलाताई पाटील भडगाव तालुका संघटक, सविता शेळके आंबेवडगाव उप तालुका प्रमुख, उषाताई परदेशी भडगांव उपतालुका प्रमुख, कुंदन पांडया पाचोरा – शहरप्रमुख, मनिषा सुरेश पाटील भडगांव-शहरप्रमुख, सोनालीताई चौधरी-भडगाव शहरप्रमुख, निताताई भांडारकर भडगाव-उपशहरप्रमुख, सुरेखाताई वाघ भडगाव-उपशहरप्रमुख, सिंकदर तडवी-आदिवासी सेना जिल्हाध्यक्ष, रामकृष्ण अभिमन पाटील वडजी यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.









