विरोधकांचे महायुतीवर शरसंधान
मुंबई (वृत्तसेवा) : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. बदलापुरातील एका शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. बदलापूरकरांनी या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे रोकली होती. याशिवाय कडकडीत बंद पाळला होता. या आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात विरोधकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याने पोलिसांवर गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. एपीआय मोरे यांच्यावर आरोपीने फायरिंग केली. पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आली आहे. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय आहे.‘विरोधी पक्षाला विरोधात बोलायचा काहीही अधिकार आहे. पोलीस जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याच्याबाबत विरोधकांना काहीही वाटत नाही का. जे पोलीस कायदा सुव्यस्था राखण्यासाठी काम करतात. उन्हात पावसात थंडी वाऱ्यात काम करतात. त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अशा वेळी विरोधकांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. या प्रकरणात चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बहीण योजनेनेने ते बिथरले आहेत. त्यामुळे ते उलटसुलट आरोप करत आहेत.’
तर सुषमा अंधारे यांनी महायुतीवर टीका केली आहे. वास्तव सगळ्यांसमोर आलं पाहिजे. असं ते म्हणाले. तर त्याने गोळी मारली हे इतक सहज आहे का ? अक्षय शिंदे एवढा ताकतवर आहे का ? त्याच्या हातात बेड्या होत्या ना ? याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
*न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!*
दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.