घर-परिवार, कामाचे ठिकाण, राष्ट्र- देश या सगळ्यांमध्ये असताना विनय अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तराध्यायन सुत्राच्या पहिल्या अध्यायाची सुरूवातच विनय सुत्रने होते. आगमात विनयाबाबत सांगण्यात आलेले आहे. विद्या शिकायची असेल तर विनय असणे महत्त्वाचा आहे. आजच्या काळात मात्र विद्या वाढलेली दिसते परंतु विनय कमी झालेला दिसतो. घर कितीही मोठे असो, सर्व सुविधांनी युक्त असो सदाचार, समजुतदारपणा, आपलेपणा आणि विनय असेल तरच त्या घराला घरपण लाभते आपल्यामध्ये विनय कसा येईल हा संकल्प आजच्या दिवशी प्रत्येकाने करायला हवा असे शासनदीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात सांगितले.
तिसरे आचार्य उदय सागरजी महाराज साहेब यांच्याकडे एक श्रावक आला आणि त्याने विनय काय असतो या बाबत विचारले. त्यावर महाराज साहेबांनी आपल्या शिष्याला आवाज दिला. आवज दिल्यावर शिष्य नम्रतेने गुरुंसमोर उभा राहिला परंतु गुरुंनी प्रतिसाद दिला नाही. असे तब्बल २१ वेळा झाले परंतु शिष्याच्या चेहऱ्यावर वैताग दिसला नाही तो विनयानेच समोर येत होता. श्रावकाला त्याचे उत्तर मिळाले. याच प्रमाणे राजा श्रेणिक, राजपुत्र अभय आणि नगरातील डोहळे लागलेल्या व्यक्तीची कथा सांगितली. श्रेणिक राजाच्या बागेत बाराही महिने आंबे येणारे वृक्ष होते. त्याच्याकडे लक्षवेधी बाणाची विद्या अवगत होती. अभयकुमार यांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. त्या गृहस्थाने चूक मान्य केली. पत्नीला आंबे खाण्याचे डोहाळे लागले होते ते पुरविण्यासाठी नाईलाजाने त्याला बागेतून आंबे चोरावे लागत असत. राजा श्रेणिक यांना त्याच्याकडील विद्या शिकवावी असे ठरले. राजा वरच्या स्थानी सिंहासनावर होते. ती विद्या काही राजाला शिकता येत नव्हती. राजाने त्याचे विनम्रतेने शिष्यत्व पत्करले व त्यांना ती विद्या शिकता आली. विनयाशिवाय विद्या शिकता येत नाही याबाबतचे हे उदाहरण समर्पक आहे. आपण सर्वांनी आपल्यात विनय यावा यासाठी पुरुषार्थ करावा. योगायोगाने परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांच्या प्रवचनाचा विषय देखील विनय हाच होता. चंडरुद्राचार्य आणि त्यांच्या विनयशील शिष्याची गोष्ट सांगितली. विनयामुळे केवलज्ञान देखील प्राप्त होते आत्मकल्याणासाठी विनय अत्यंत आवश्यक असल्याचे महाराज साहेब म्हणाले.