जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात घडला प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) :- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप असलेल्या ग्रंथालय परिचाराने गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरसोली ते दापोरा रेल्वेरुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडधाने (५३, रा. समर्थ कॉलनी, मानवसेवा विद्यालयाजवळ, पिंप्राळा, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ते कामाला होते. २० वर्षीय विद्यार्थिनीने दि. २६ ऑक्टोबर रोजी कैलास कडधाने यांनी विनयभंग केल्याची फिर्याद रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिल्यावरून मंगळवारी ३१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरहू कडधाने हा आज दुपारी शिरसोली ते दापोरा या दरम्यान असलेल्या रेलवे रुळाकडे गेला होता. तेथे एका रेल्वेखाली कैलास कडधाने याने स्वतःला झोकून दिले.
रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ तालुका पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. सुरुवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून पोलीस तपास करीत होते. मात्र मृतदेहाची ओळख पटताच नातेवाईकांना माहिती देण्यात आली. रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. मयत कैलास कडधाने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.