जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी एकाला विनाकारण डांबून ठेवत मारहाण केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे दाखल करण्यात आल्याने पुन्हा एकदा पोलीस दलाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उमटले आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे आणि मारहाण झालेल्या प्रवीण अशोक महाजन यांनी एकत्रितपणे पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.
शहरात दि. ३१ डिसेंबर रोजी प्रवीण अशोक महाजन (वय ३३, रा. गणेश कॉलनी) हे कामानिमित्त जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक राजेश मानगावकर यांना कॉल केला असता, त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि पोलिस ठाण्यात मारहाण करून तीन तास डांबून ठेवण्यात आले, असा आरोप प्रवीण महाजन यांनी केला आहे. यामुळे पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, पोलिस निरीक्षकांवर आणि पोलिस ठाण्याच्या व्यवस्थेवर गंभीर आरोप करणारे निवेदन दिले असून, हे दुर्लक्ष केल्याने सामान्य नागरिकांना त्रास होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर, जर पोलिस निरीक्षकांवर कारवाई केली गेली नाही, तर दि. ४ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही बाब गंभीर असून, पोलिस निरीक्षकांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पोलिसांच्या कामकाजात सुधारणा घडवण्यासाठी त्वरित कार्यवाहीची आवश्यकता आहे.