नैनिताल ( वृत्तसंस्था ) – डोकं उडवून आईची हत्या करणाऱ्या मुलाला नैनितालमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोषी डिगर सिंहला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जिल्हा न्यायालयाचे प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश प्रीतू शर्मा यांच्या आदेशानुसार सिंह याला दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.
7 ऑक्टोबर 2019 रोजी चोरगलिया येथील उदयपूर रेक्वाल क्विरा फार्ममधील या घटनेत मुलाने आईचे डोके धडावेगळे केले होते. काही लोक मदतीसाठी आले असता डिगर सिंहने त्यांच्यावरही हल्ला केला होता. मयत महिलेचे पती सोबन सिंह यांनी मुलगा डिगर सिंह याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर चोरगलिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जोमती देवीसोबत मुलाचा घरात अचानक वाद झाला आणि अचानक डिगरने विळ्याने वार करुन आईचा शिरच्छेद केला.
डिगर सिंह अंगणात आईच्या मानेवर विळ्याने वार करत होता. त्याने तिच्या डोक्याचे केस एका हाताने धरले होते. आई जिवाच्या आकांताने ओरडत होती. आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारी देवकी देवी आणि डिगरची पत्नी नयना कोरंगा घटनास्थळी आल्या डिगरच्या पत्नीनेही पती विरोधात साक्ष दिली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी १२ साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात आले होते.. न्यायालयाने नऊ महिन्यांनी या खटल्याचा निकाल दिला.