मूळ वेतनात ठोक अडीच ते पाच हजारांची वाढ
मुंबई ( प्रतिनिधी ) – एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ झाली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
आज एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये चर्चा झाली. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले. त्यावेळी या प्रस्तावाला अजित पवारांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यानंतर याला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी अनिल परब हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले या पगारवाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला 600 कोटींचा भार येणार आहे.
एसटीचे शासनाच्या सेवेत विलिनीकरण करण्यात यावं यासाठी गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयासमोर असून समितीच्या अहवालानंतर यावर निर्णय होणार आहे. पण तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही परबांनी म्हटलं होतं. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला होता. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज पुन्हा बैठक झाली. या बैठकीत निर्णयाची शक्यता होतीच. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती मंत्री अनिल परब यांनी केली होती.
परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह संपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते.